Tuesday, July 15, 2025

मी आणि माझे मन

 आम्हा दोघांचं हे वागणं, हल्ली असंच चालत राही 

मन म्हणतं एकदा बोल तिच्याशी, मी त्याचं ऐकत नाही


मी म्हणतो मनाला, की एकदा बोलून तुझं भागत नाही

मन म्हणतं आज एवढं ऐक, बाकी मी काही मागत नाही


अरे तुझं काय जातंय, एकदा बोल असं सांगायला

एक अनामिक हुरहूर मग, मनात लागते रांगायला 


तुझ्या एकदा बोल च्या नादात, मी काळवेळ पहात नाही

आणि बोलायला सुरुवात केली, की मी माझा रहात नाही


काहीतरी करून मग मी, आज मनाला शांत करतो

उद्या पुन्हा हेच होणार, निदान आजचा दिवस तर सरतो


मनवण्या माझ्या मनाला, मी कितीदा भाव द्यावा?

पुन्हा आठवावे तिला एकदा अन् , मनाने मनाचा पुन्हा ठाव घ्यावा

Saturday, May 17, 2025

स्वप्न

 भल्या पहाटे स्वप्न संपता, अलगद येते जाग

जागृत मन मग घेऊ लागते, त्या स्वप्नाचा माग


क्षणात पुढती उभा राहतो, आठवणींचा गाव

दाटून येती पुन्हा नव्याने, जुनेच हळवे भाव


कधी आनंदी कधी विनोदी, दुःखाचे कधी सूर

हसता हसता कधी अचानक, भरून येतो ऊर


जुनेच सारे हवे वाटते, मार्ग काही दिसेना

आनंदासह भयही दिसते, मेळ काही बसेना


काय हवे अन काय नकोसे, माझे मला कळेना

संभ्रमातल्या अर्जुनास या, कृष्ण काही मिळेना


मलाच आता लागत नाही, माझ्या मनीचा ठाव

मग मी अलगद मिटून घेतो, आठवणींचा गाव

Tuesday, September 3, 2024

हिशोब

पावसातल्या गरम चहाचा, दरवळ अजुनी नाकी रे

सावकाश तू धाव जीवना, हिशोब काही बाकी रे


सुखदुःखाचा आनंदाचा, हिशोब थोडा घेतो रे 

हाती धरल्या कर्तव्याला, न्याय जरासा देतो रे


काही सुटले काही तुटले, थोडे गोळा करतो रे

आयुष्याच्या कॅनव्हास वर, रंग आगळे भरतो रे


आज नव्याने नवा सूर्य बघ, नवीन आशा देतो रे

भविष्यातल्या दिव्य क्षणांना, कवेत अलगद घेतो रे


सभोवताली जग हे सुंदर, मीच तयाचा वाली रे

मीच काव्य अन् गीत लिहितो, मीच लावतो चाली रे


भाषण देतो, लेख लिहितो, कामही करतो काही रे

दुःख, शोक अन राग कराया, वेळच उरला नाही रे


हळूहळू तू चाल सांगतो, पाऊल छोटे टाकी रे

सावकाश तू धाव जीवना, हिशोब अजुनी बाकी रे

आठवण

 सखे हे अचानक, कसे आज व्हावे

तुझ्या आठवांचे काहूर यावे 

कशा गाठी त्या अन्, कशा भेटी होती

कधी तो सिनेमा, कधी नाटके ती


नव्यानेच मी ते, पुन्हा आठवावे

तुझ्या वागण्याचे, हसू आज यावे

हाती तिकिटे, मी वाट पाही

अन् तू कधीही, वेळेत नाही


येणे उशिरा नी, जाण्याची घाई

अशी भेट अपुली, अर्धीच होई

पुन्हा भेटू तेव्हा, जरा वेळ काढू

तुझे बोलणे हे, मला मान्य होई 


कधी व्यस्त तू अन्, कधी व्यस्त मीही

मनासारखे, बोलणे होत नाही 

संवाद थोडा, तरी हे सत्य आहे

तुझ्या सोबती हा, सखा नित्य आहे.

सखे नेहमी हसत रहा

नयनांचा तो कटाक्ष भोळा, दुःखाचाही विसर पडे

सहज पाहता तू प्रेमाने, पुन्हा तुझ्यावर प्रेम जडे 


भोवतालच्या ग्रीष्म झळांनी, मनास माझ्या छळले होते.

तुझ्या बटांच्या गर्द सावलीत, सुख ते मजला कळले होते.


जरी भोवती सगे सोबती, तरीही काही कमी असे

तू असण्याचा विचार केवळ, पूर्णत्वाची हमी देतसे


आयुष्याच्या इंद्रधनूला, असती केवळ रंग सहा

हास्य तुझे हा रंग सातवा, सखे नेहमी हसत रहा

मी आणि माझे मन

 आम्हा दोघांचं हे वागणं, हल्ली असंच चालत राही  मन म्हणतं एकदा बोल तिच्याशी, मी त्याचं ऐकत नाही मी म्हणतो मनाला, की एकदा बोलून तुझं भागत नाही...